'११२’ वर एक कॉल अन् हरवलेली बॅग परत मिळाली #chandrapur #Korpana #Gadchandur #call112

Bhairav Diwase
0

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- बसमधून बॅग हरविल्याची तक्रार ११२ वर प्राप्त होताच गडचांदूर पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या काही तासांतच त्या तरुणाला त्याची बॅग परत मिळाली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

योगेश पुट्टावार (रा. नांदा, ता. कोरपना) हा युवक २४ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान बसने प्रवास करताना त्याची बॅग हरवली. त्याने तत्काळ ११२ या पोलिसांच्या हेल्पलाइनवर कॉल करून आपली बॅग चोरीला गेली, बॅगेत दोन हजार रुपये रोख तसेच क्रीडा प्रमाणपत्र असल्याचे सांगितले. सीएसएफ मुंबई येथे कॉल गेल्यानंतर तो डायल ११२ प्रकल्प चंद्रपूरशी जोडण्यात आला. यावेळी त्याला घटनेची हकिकत विचारली. ही घटना गडचांदूर पोलिस स्टेशन हद्दीतील असल्याचे समोर आले. त्यांनी लगेच डायल ११२ प्रतिसादक पोलिस अंमलदार पोलिस हवालदार धर्मेंद्र रामटेके व पोलिस अंमलदार राहुल बनकर यांना माहिती देऊन बस स्टॉप चौक गडचांदूर येथे शोधकामी पाठविले. यावेळी बस क्रमांक एमएच १४ एचबी ८८२३ या बसची तपासणी केली असता, त्या बसमध्ये तक्रारदाराची बॅग मिळून आली. पोलिस अंमलदारांनी योगेश पुट्टावार याला बोलावून त्याला बॅग सुपुर्द केली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


अडचण आल्यास कॉल करा
अडचण आल्यास किंवा पोलिसांची मदत हवी असल्यास डायल ११२ वर संपर्क केल्यास जवळील पोलिसांचे पथक लगेच घटनास्थळ गाठून त्याला मदत करते. चंद्रपूर जिल्ह्यात या उपक्रमाची प्रभावीपणे कार्यवाही होत असून, त्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. अडचण असल्यास किंवा पोलिसांची मदत हवी असल्यास डायल ११२ वर संपर्क करण्याचे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)