चंद्रपूर:- उन्हाळी धान, सोयाबीन व कापूस कवडीमोल भावासह घटलेले उत्पन्न या समस्यातून उभारी घेत चंद्रपूर जिल्ह्यातील बळीराजा पुन्हा नव्या जोमाने शेतात राबतांना दिसत आहे. जून महिन्याला सुरुवात झाली असल्याने खरीप हंगामाच्या तयारीला चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी लागला असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला गती आली आहे. शरीरात कष्टांची तयारी असलेल्या मनात आशेचा किरण कायम असून आता बळीराजाच्या नजरा पावसाच्या प्रतिक्षेत आकाशाकडे खिळल्या आहेत. (Shetshivar decorated, Baliraja's eyes to the sky!)
विदर्भासह चंद्रपूर जिल्ह्यात धान, सोयाबीन व कापूस आदी पिकांचे उत्पादक होते. खरीप हंगाम म्हणजे अख्ख्या वर्षभर कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सज्ज होण्याचा काळ. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच बळीराजा पावसाच्या येण्याची वाट न पाहताच मान्सूनपूर्व मशागतीच्या कामाला लागलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेताची साफसफाई करण्यासह अन्य कामे करण्यामध्ये शेतकरी सध्या गुंतले आहेत. तर बियाण्यांचासह खत खरेदीसाठी शेतकर्यांची बाजारपेठेमध्ये ओढ वाढली आहे.
अनेक शेतकरी शेतातील धान, सोयाबीन व कापूसाचा कचरा जाळून, वेचून जमिनीची नांगरणी, वखरणी केली आहे. पावसाचे आगमन, पिकाचा कालावधी, शेतातील जलसिंचन सुविधा या सर्वांचा अंदाज बांधून प्रत्येक शेतकरी आपापल्या शेतात पेरणी सुरू करतो.
जोरदार सरी कोसळताच पेरणीला होणार प्रारंभ
विदर्भासह चंद्रपूर जिल्ह्यात मान्सूपूर्व पावसाची चाहुल लागली आहे. मात्र, अद्याप पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. वातावरणातील बदल लक्षात घेता शेतकरी मशागतीपूर्वीची कामे आटोपून घेण्याची लगबग करीत आहे. पावसाच्या 2-4 जोरदार सरी कोसळताच पेरणीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. सध्या शेतशिवार सजलेले दिसत आहे. काळी माती पावसाच्या पाण्याने ओलिचिंब होण्यास आतुर झालेली आहे, तर बळीराजा आकाशाकडे वरुणराजा बरसण्याची आस धरून बसला आहे.