Top News

बोगस बियाण्याच्या गोदामातून दीड कोटींचा माल जप्त #chandrapur #Wardha


वर्धा:- म्हसाळा येथे कापसाचे बोगस बियाण्यांची अनधिकृत पॅकिंग करून विदर्भात त्याची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर 12 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास सेवाग्राम पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा आणि कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून जवळपास 1 कोटी 55 लाखांचा माल जप्त केला. दरम्यान, काल रात्रीपासून सुरू असलेल्या कारवाईबद्दल आज मंगळवार 13 रोजी सकाळी 11 वाजता घटनास्थळीच पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रपरिषद घेऊन या कारवाईबद्दल माहिती दिली.

गुजरात येथून बियाण्यांचा कच्चा माल म्हसाळा येथील गोडाऊनमध्ये आणला जात असल्याची तक्रार तालुका कृषी अधिकार्‍याने दिली होती. 12 रोजी बोगस बियाणे येणार होते. पोलिसांनी सापळा रचून घटनास्थळावर धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा साठा आढळून आला. यासोबतच या कच्च्या बियाण्यांची वेगवेगळ्या कंपन्यांच्या आकर्षक पाकीटात पॅकींग करून कृषी केंद्राच्या मार्फत शेतकर्‍यांपर्यंत पोहचवण्यात येत होते. ही पॅकींग मजूर लावून करण्यात येत होती. त्यानंतर वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आदी जिल्ह्यात वितरीत केला जात होते. विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्यात हे बोगस बियाणे विकल्याची कबुली मुख्य सुत्रधार राजू जयस्वाल याने दिली. हा गोरखधंदा मागील एक महिन्यापासून सुरू होता. आतापर्यंत 14 टन बोगस बियाणे विविध जिल्ह्यात विकल्याची कबुली जयस्वाल याने दिली. अजूनही 15 ते 16 टन बियाणे विविध कंपन्यांच्या आकर्षक पाकीटात पॅकींग करून वितरीत करण्यात येणार होते. मात्र, या प्रकाराचा भंडाफोड झाला आणि जवळपास 16 टन बोगस बियाणे जप्त करण्यात आले.

आतापर्यंत 29 टन बोगस बियाणे आले असून त्यापैकी 14 टन बियाणे विकल्याची कबुली जयस्वाल याने दिली. या कारवाईत 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 8 जणांना अटक केली आहे. गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये राजू जयस्वाल (38) रा. रेहकी, धरमसिंग यादव (27) रा. जौनपूर उत्तर प्रदेश, राजकूमार वडमे (39) रा. रेहकी, हरिश्‍चंद्र उईके (18) रा. राडोंगरी जि. छिंदवाडा मध्यप्रदेश, अमन धुर्वे (18), सुदामा सोमकूवर (27) दोन्ही रा. लास जि. छिंदवाडा मध्यप्रदेश, गजू बोरकर रा. सेलू, विजय बोरकर रा. हमदापूर, प्रवीण रा. वरोरा जि. चंद्रपूर, वैभव भोंग, रा. अमरावती, हिना किराणाचे मालक यवतमाळ, पंकज जगताप, अमरावती, गजभिये (क्रिस्टल कंपनी नागपूर), गजू ठाकरे, रा. कारला रोड आणि शुभम बेद रा. वर्धा यांचा समावेश आहे. या कारवाईत 16 टन बोगस बियाण्यांसह 1 कोटी 55 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी यावेळी दिली. दरम्यान, विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी घटनास्थळ गाठून याबाबतची माहिती जाणून घेतली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, सेवाग्रामचे ठाणेदार जळक, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड आदींनी केली.
देवाण घेवाणीसाठी गजूने घेतले साडेतीन लाखाचे कमीशन

गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील दरामली येथील महेंद्र आणि ईडर येथील राजू यांच्याकडून 14 टन बोगस बियाणे आणले. मात्र, या देवाण घेवाण गजू ठाकरे याने केली. यासाठी गजू ठाकरे याने 3 लाख 50 हजार रुपयांचे कमीशन घेतल्याचे कारवाईदरम्यान निष्पन्न झाले.


कापसाचे बोगस बियाण्यांचा 14 टन माल आल्यानंतर सिलींग व लेबलींगसाठी लागणारे कापसाच्या बियाणांचे पॅकेट गजू बोरकर, विजय बोरकर, प्रवीण, वैभव भोंगे, हिना किराणा, पंकज जगताप, गजभिये व शुभम बेद यांनी दिल्याची कबुली राजू जयस्वाल याने दिली.

बोगस बियाण्यांची विक्री एजन्टाद्वारे:- बमनोटे

बोगस बियाण्यांची विक्री कृषी केंद्रातून होत नाही. ही बोगस बियाणे एजंट त्या-त्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्याचे काम करतात. कमीशनवर हे एजंट काम करीत असून थेट शेतकर्‍यांना ते विकत असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने