यवतमाळ:- काका-पुतणे रात्री बंदूक घेऊन वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी गेले. शिकार करताना काकाचा नेम चुकला आणि बंदुकीच्या गोळीने थेट पुतण्याचा निशाणा साधला. पुसद तालुक्यातील फेट्रालगतच्या जंगलात घडलेल्या या थरारक घटनेची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा आहे. या प्रकरणी अखेर खंडाळा पोलिसांनी काकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेट्रा गावातील बाळू पांडुरंग कुरडे व श्याम कुरडे हे काका-पुतणे बुधवारी रात्री जंगल परिसरात शिकारीसाठी छर्ऱ्याची १२ बोरची मोठी बंदूक घेऊन गेले होते. अंधारात शिकार टप्प्यात येताच काकाने बंदुकीतून फायर केले. मात्र येथेच घात झाला. काकाचा नेम चुकल्याने बंदुकीची गोळी पुतण्या श्याम याला लागली. बंदुकीतून सुटलेले छर्रे त्याच्या पाठीत व पोटात गेल्याने तो गंभीर जखमी होऊन कोसळला.
या प्रकाराने घाबरलेल्या काकाने अज्ञात मारेकऱ्यांनी दोघांवर हल्ला केल्याचा बनाव केला. याबाबत खंडाळा पोलिसांत फिर्यादही दिली. पोलिसांनी जखमीला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. जखमी श्याम कुरडेचा भाऊ करण कुरडे याने याप्रकरणी खंडाळा पोलिसांत काकाविरुद्ध तक्रार दाखल केली.