सिनेस्टाइल पाठलाग करून युवकावर प्राणघातक हल्ला chandrapur

चंद्रपूर:- धारीवाल कंपनीत पर्यपेक्षक म्हणून नोकरीला असलेल्या युवकाचा कंपनीतून घराकडे परत येत असताना सिनेस्टाइल कारचा पाठलाग करून इरई नदी परिसरात त्याला बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान, हा हल्ला विभक्त पत्नीने गुंडांकडून करविल्याचा आरोप जखमी युवक रामकिशोर नवलकिशोर सिंग (२९) यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

रामकिशोर सिंग हा मागील दहा वर्षांपासून धारीवाल कंपनीत पर्यवेक्षक म्हणून नोकरीला आहे. त्याने सरिता मोहन पुसनाके या तरुणीशी विवाह केला. दोघांनाही चार वर्षांचा मुलगा आहे. परंतु, कौटुंबिक वादामुळे पत्नी ही राजुरा येथे माहेरी वास्तव्यास असून, चंद्रपूर न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण सुरू आहे. परंतु, यानंतरही पत्नी सरिता पुसनाके ही वारंवार धमकी देत असून, बळजबरीने घरात घुसून शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार सुरू आहे. खोट्या तक्रारी करून गुन्हेही दाखल केले आहे. दरम्यान, १ जून रोजी कंपनीतून घराकडे कारने येत असताना चार ते पाच गुंडांनी पाळत ठेवून दुचाकीने कारचा पाठलाग केला. इरई नदी परिसरात कारसमोर दुचाकी आडवी करून कार थांबविली आणि कारच्या तोडफोडीसह लाकडी रॉडने मारहाण केली. यात हाताला गंभीर दुखापत झाली असून, कारच्या काचाही तोडण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची तक्रार रामकिशोर सिंग याने रामनगर पोलीस ठाण्यात केली. विभक्त पत्नी सरिता पुसनाके हिच्या सांगण्यावरूनच गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप करीत पत्नी सरिता पुसनाके आणि हल्लेखोर गुंडांवर कारवाईची मागणी रामकिशोर सिंग यांनी केली आहे.

हल्लेखोरांवर पोलिसांनी भादंवि कलम ३२४, २९४, ४२७, १०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अद्याप हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही. आरोपींवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करणे गरजेचे असताना गुन्ह्यात वाढ करण्यात आली नाही. दरम्यान, आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. पोलीस संथगतीने कारवाईकरीत असून, जीवितास धोका असल्याची भीती त्याने व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेला किशोर पोतनवार, प्रेमिला लेेडांगे, वर्षा काळभूत, नीलिमा शिरे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत