आक्षेपार्ह स्टेटसवरुन तणाव, जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू #kolhapur #chandrapur #gadchiroli #Maharashtra


कोल्हापूर:- स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून कोल्हापूर शहरात मंगळवारी दोन गटात झालेल्या वादानंतर रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.

या आदेशाद्वारे पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली. जमाव जमवणे, मिरवणुका काढण्यास बंदी असेल. सोमवार १९ जूनपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. दरम्यान, हा वादाचा प्रकार घडल्यानंतर कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता. जमाव करून उभ्या असणाऱ्यांना पोलिस हटकत होते.

गंजी गल्ली परिसरात दगडफेक

हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.

शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद

सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. तसेच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ४०० ते ५०० तरुण गंजी गल्लीत घुसल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. काही घरांवर दगडफेड झाल्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद आहे.

पोलिस अधीक्षकांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवले

परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बोलवले असून, सध्या पोलिस अधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये बैठक सुरू आहे. दरम्यान, बिंदू चौकात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह, सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या