Top News

गुड न्यूज, शेतकऱ्यांना आता एक रुपयात मिळणार सर्वसमावेशक पीक विमा! #Chandrapur #pombhurna

पोंभुर्णा:- महाराष्ट्रात २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. असे असताना, यंदापासून राज्य सरकारच्या वतीने नवी पीक विमा योजना राबवली जाणार आहे. यामध्ये एक रुपयात शेतकऱ्यांचा विमा काढण्यात येणार आहे. ‘सर्वसमावेशक पीक विमा’ योजना असे नाव असून, यासंदर्भात राज्य सरकारच्या कृषी विभागाने नुकताच याविषयी शासननिर्णय जारी केला आहे.

२०२३-२४ सालाच्या अर्थसंकल्पात यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्याची यंदापासून अंमलबजावणी होत आहे. विमा घेण्यासाठी शेतकरी पीक विमा पोर्टल, सामुदायिक सुविधा केंद्र किंवा बँकेत शेतकरी आपला अर्ज सादर करू शकतील. पीकाच्या विमाची मुदत दि. ३१ जुलै २०२३ पर्यंत देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी www.pmfby.gov.in या पोर्टलचे साहाय्य घेऊ शकता.

पेरणी ते काढणीपश्चात नुकसानीच्या सर्व टप्प्यातील नुकसान भरपाईस विमा घेणारे शेतकरी पात्र राहतील. त्याबरोबरच नैसर्गिक आपत्ती उदाहरणार्थ आग, वीज पडणे, वादळ, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, कीड, रोगराई, पावसाची अनियमितता, पूरपरिस्थिती, गारपीट, हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी न होणे, स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, काढणीपश्चात नुकसान आदी कारणांसाठी शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई मिळणार आहे.


तालुक्यात अधिसूचित पिके धान, सोयाबीन, तूर व कापूस आहेत. बदलते हवामान व नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान पासून आर्थिक संरक्षण करण्यासाठी सर्वसमावेशक पिक विमा योजनेत पोंभुर्णा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
चंद्रकांत निमोड
पोंभुर्णा तालुका कृषि अधिकारी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने