Top News

पतीच्या विरहात पत्नीनेही घेतला अखेरचा श्वास

गडचिरोली:- धान पिकाला खताची मात्रा देताना २२ ऑगस्ट रोजी देसाईगंज तालुक्यातील चोप येथील मोरेश्वर मारुती मुंडले (५२) हे अचानक बांधित कोसळून मृत्युमुखी पडले. डाेळ्यादेखत पतीचा मृत्यू झाल्याचा धक्का पत्नी मीनाक्षी हिला सहन झाला नाही. ती बेशुद्ध पडली हाेती. तेव्हापासून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू हाेते. मात्र, उपचारादरम्यान तिचाही २ सप्टेंबर राेजी दुपारी १ वाजता मृत्यू झाला.

मोरेश्वर व मीनाक्षी दोघेही धान पिकाला खत देण्यासाठी शेतात गेले होते. काही काळ खत देऊन झाल्यानंतर अचानक मोरेश्वर मुंडले यांना भोवळ आली व ते बांधित कोसळले. मुंडले यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मीनाक्षी या बेशुद्ध पडल्या होत्या. बेशुद्ध अवस्थेतच ब्रह्मपुरी येथे उपचारासाठी नेण्यात आले. ब्रह्मपुरी येथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पती मोरेश्वर मुंडले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत चालल्याने मीनाक्षी यांना नागपूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. 

पाच दिवसांअगोदर मेंदूची शस्त्रक्रिया झाली. मात्र, प्रकृती खालावतच चालली हाेती. अखेर मीनाक्षी यांचा शनिवारी दुपारी १ वाजता मृत्यू झाला. दहा दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली व एक अविवाहित मुलगा, सासू असा परिवार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने