आमदार धोटेंचे आरोप तथ्यहिन; रुग्णालयात जाऊन आवाजाची तपासणी करा..!

Bhairav Diwase
0

दादाच्या दांडीयाची तक्रार करणाऱ्या 'त्या' सुज्ञ नागरिकासह सुभाष धोटेंना देवराव भोंगळे यांचे आवाहन.

राजुरा:- दि. १६ आक्टोंबर २०२३ रोजी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. सुभाष धोटे यांच्या कार्यालयाकडून समाजमाध्यामांवर “जि. प. शाळेतील दांडीयाची परवानगी रद्द करा; मुख्याध्यापक व शिक्षणाधिकाऱ्यांवर कार्यवाही करा अशी तक्रार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव व आरोग्यमंत्र्याकडे आमदार धोटेंनी केल्याची बातमी प्रसारीत झाली. त्यावरून आता देवराव भोंगळे ही एक्शन मोड वर आले असून आमदार धोटेंसह ज्या सुज्ञ नागरिकाला वाटते की दादाच्या दांडीयाच्या आवाजामुळे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना त्रास होतो; त्यांनी गरबा महोत्सव सुरू असतानाच रुग्णालयात जाऊन खरोखरच आवाज येतो का? याची स्वेच्छेने तपासणी करावी असे आवाहनच त्यांनी आमदार सुभाष धोटेंसह तक्रार करणाऱ्या त्या सुज्ञ नागरिकाला केले आहे.
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र राजुरा च्या वतीने नवरात्रीच्या पावन पर्वावर राजुरा शहरातील जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ विद्यालयाच्या मागील पटांगणावर भरविलेल्या माँ शक्ती गरबा महोत्सव २०२३ दादाचा दांडीया या कार्यक्रमाने पहिल्याच वर्षी शहरातील नागरीकांना आकर्षून गरबाप्रेमींमध्ये लोकप्रियता मिळविली, त्यामुळे आमदार धोटेंना ते आवडले नसावे आणि त्या असूयेतूनच आमदार साहेब असे तथ्यहिन विषय आवडीने चघळण्याच्या निष्फळ प्रयत्न करीत आहेत, असेही ते म्हणाले.

आमदार धोटेंनी केलेल्या तक्रारीमध्ये, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी कोणत्या अधिकारात सदर गरबा दांडीयाला परवानगी दिली, असा उल्लेख केला. तर आजपर्यंत सरकारी जागेवर किंबहुना याचठिकाणी अनेक खाजगी कार्यक्रमं झालीत. त्यांना ज्या अधिकारात परवानगी दिल्या जाते; तीच नाहरकत परवानगी शाळा व्यवस्थापन समीतीने आमच्या गरबा महोत्सवास रीतसर दिली आहे. याशिवाय, शाळेची कार्यालयीन वेळ ही सकाळी ११:०० ते सायं. ०५:०० वाजेपर्यंत असून गरबा महोत्सव सायंकाळी ०७:३० वाजता सुरू करण्यात येतो; त्यामुळे शालेय शिक्षणावर किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधा पोहोचविणारा कोणताही प्रकार सदर गरबा महोत्सवाचे याठिकाणी आयोजन केल्याने होत नाही. एवढेच नव्हे तर आमदार महोदयांना राजुरा शहरामध्येच अन्य शाळा पटांगणावर भरविलेल्या गरबा महोत्सवांची माहीती नाही का? की एखाद्या असुयेतून ते अशा प्रकारच्या तथ्यहिन तक्रारी करणाऱ्या बालीशबुद्धीला खतपाणी घालून शहरातील सामाजिक व आध्यात्मिक शांततेला गालबोट लावतायत? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

आमदार सुभाष धोटे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये दादाचा दांडीया या गरबास्थळापासून राजुरा उपजिल्हा रुग्णालय हे नजीक असल्याने त्याठिकाणी उपचारार्थ असणाऱ्या रुग्णांना त्रास होत असल्याचे तथ्यहिन आरोप केले आहेत, परंतू मानवी आरोग्याला वा रुग्णसेवेला बाधा पोहचेल असे कोणतेही प्रकार आमच्या गरबा महोत्सवामुळे होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन तसेच मी स्वतः जातीने हजर राहून रुग्णालयात गरबास्थळावर वाजणाऱ्या DJ चा आवाज येतो का याची तपासणी केली आणि त्यानंतरच याठिकाणी गरबा महोत्सवाचे आयोजन करावयाचे निश्चित केले होते. तथापि आमदार साहेब व त्यांच्या त्या सुज्ञ नागरीकाची काही हरकत असल्यास त्यांनी दादाचा दांडीया सुरू असतानाच रुग्णालयात जाऊन DJ च्या आवाजाची तपासणी करावी, असे आवाहनच देवराव भोंगळे यांनी आता आमदार धोटेंना दिले आहे.

पुढे बोलताना, राहता राहिला प्रश्न रुग्णांना असुविधा किंवा ध्वनीप्रदूषणाचा त्रास होत असल्याची खोटी अफवा पसरविण्याची तर हे कोणत्या हाडाचे दुखणे आहे हे वेगळे सांगायला नको! नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर स्थानिकांचा आध्यात्मिक आनंद द्विगुणित करण्यासाठी स्थानिक नागरीकांच्या आग्रहावरूनच सदर गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये असंतोष निर्माण झाला असे म्हणने सपशेल निरर्थक आहे. याउलट मागील दोन महिन्यांपासून याच मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, राजुरा च्या वतीनं शहर व परीसरातील नागरिकांसाठी लोकसेवेचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अलिकडेच राजुरा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने शहरात नेत्रचिकीत्सा, चष्मेवाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीरात १८६६ गरजू रुग्णांना लाभ देण्यात आला; दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना तसेच रक्ताची अडचण भासणाऱ्या गरजवंताना वेळोवेळी मदत केल्या जाते. त्यामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ चालला आहे, असे बिनबुडाचे आरोप करणाऱ्या आमदार धोटे व त्यांच्या सुज्ञ नागरीकांच्या बुद्धीची मला कीव येते, अशी कोपरखळी ही देवराव भोंगळे यांनी यावेळी लगावली.

आमदार धोटेंची भुमिका हिंदुत्ववविरोधी

सद्या देशभरातील कॉंग्रेसी नेत्यांकडून सतत होणारी हिन्दुत्व व देवीदेवतांच्या अपमानाची मालीका ही देशवासियांसाठी काही नविन नाही; त्याचाच एक भाग म्हणून आमदार सुभाष धोटे जर या पवित्र नवरात्रोत्सवाच्या पर्वावर सुरू असलेल्या आमच्या गरबा महोत्सवाला असा अनाठायी विरोध करत असतिल तर त्यांच्या या विरोधाला जनता नक्की लक्षात ठेवेल. देवराव भोंगळे

आमदार धोटेंनी कधी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना योग्य उपचार मिळावा यासाठी काय प्रयत्न केले?

राजुरा शहर हे एकुणच विधानसभा क्षेत्राच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. याठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयातील समस्या संदर्भात मला काही रुग्णांकडून कळाल्यावर मी दि. ०९/१०/२०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालयास आढावा भेट दिली. त्यावेळेस दवाखान्यात डॉक्टर्सच उपलब्ध नसल्याची तक्रार रुग्णांकडून प्राप्त झाल्या. तेव्हा मी स्वतः तातडीने जिल्हा शल्य चिकित्सकांना भ्रमणध्वनी करून दोन डॉक्टर्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली, त्यावर तातडीने उपाययोजना करत त्यांनी दोन डॉक्टर्स उपलब्ध करून देण्यात आले. परंतू आपले होमटाऊन असलेल्या राजुरा शहरातील याच उपजिल्हा रुग्णालयाच्या या वास्तवासंदर्भात मा. मुख्यमंत्री वा मा. आरोग्य मंत्र्यांना पत्रव्यवहार करण्याचे पुण्यकर्म कधी आमदार साहेबांकडून झाले नाही; मात्र कोण्या अदृश्य असुयेतून त्यांच्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांप्रती असलेला कळवळा जागृत झाला, हे समजण्यापलीकडचे आहे.- देवराव भोंगळे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)