आरसीपीएल सिमेंट कंपनी विरोधात दहा दिवसांपासून परसोडा गावात अन्नत्याग आंदोलन

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- महाराष्ट्र आणि आंध्रसीमेवरील परसोडा गावात आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांनी मागील दहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.



प्रशासनाने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. उपोषणकर्ते काटकर यांची प्रकृती खालावली आहे. प्रकल्पग्रस्तांनी रेटून धरलेल्या विविध मागण्यापूर्ण होईपयंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी कठोर भूमिका घेतल्याने जिल्हा आणि कंपनी प्रशासनाला धडकी भरली आहे.



आरसीसीपीएल सिमेंट कंपनी ही यवतमाळ जिल्ह्यातील मुकूटबन येथे आहे. तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सिमेवर चंद्रपूर जिह्यातील शेवटच्या टोकावर परसोडा गाव वसले आहे. या गावापासून सिमेंट कंपनी ही पाच ते सहा किमी अंतरावर आहे. चंद्रपूर आणि यवतमाळच्या मध्यातून पैनगंगा नदी वाहत आहे. त्यामुळे कंपनीला लागणारे पाणी याच परिसरातून मिळत आहे. विशेष म्हणजे परसोडा गावाच्या शेतशिवारात सिमेंट तयार करण्याकरीता लागणारी चुनखडीचे खनिज साठे मोठ्या प्रमाणात आहेत. ते खनिजे चांगल्या गुणवत्तेची आहे. त्यामुळेच परसोडा शिवारातील चुनखडीला कंपनीमध्ये मोठी मागणी आहे. याकरीता आरसीसीपीएल कंपनीने परसोडा परिसरात एका दलालामार्फत शेतजमिन खरेदीचा सपाटा सुरू केला आहे. सध्या परसोडा शिवारातील सुमारे दोनशे हेक्टर जमिन कंपनीने खरेदी करून त्यामधून चुनखडीचे उत्खनन सुरू केले आहे. हे उत्खत्न सुरू करताना शेतकऱ्यांना प्रचंड त्रास देण्यात येत आहे. शेतजमिन खरेदी केलेल्या प्रकल्पग्रस्तांची प्रचंड पिळवणूक केली जात आहे. या परिसरातील शेतात सोयाबीन, कापूस, चना, हरभरा, भाजीपाला उत्पादीत केले जाते.



परंतु कंपनीने विकत घेतलेल्या शेतशिवारात उत्खन्न सुरू केल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ज्या शेतकऱ्यांची शेतजमिन खरेदी केली त्यांना नियमानुसार लाभ देण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे परसोडा गावाला पोचमार्ग आहे. या मार्गाने फक्त 9 टनाची वाहतूक केली जावू शकते. परंतु कंपनीने खनिजाची ओव्हरलोड वाहतूक करून पोचमार्गाची वाट लावली आहे. रस्ता पूर्णत: नष्ट झाल्याने या मार्गाने ये जा करणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे हे गाव पेसा मध्ये समाविष्ठ आहे. परंतु पेसाच्या नियमांनाही कंपनी पायदळी तुडविल्या जा आहेत. कंपनीने ज्या शेतकऱ्यांची जागा खरेदी केली त्यांच्या जागेत उत्खनन सुरू करून जे जागा विकण्यास तयार नाहीत त्या शेतकऱ्यांना कंपनी तर्फे त्रास दिल्या जात असल्याचा प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळेच आरसीपीएल सिमेंट कंपनीने लिज क्षेत्रातील संपूर्ण ७५६.१४ हेक्टर जमीन सरसकट भूसंपादित करावी, प्रकल्पग्रस्तांना प्रती एकर पन्नास लाख रुपये व एक सातबारा एक नोकरी द्यावी, परसोडा गावाच्या मुख्य रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक तातडीने थांबविण्यात यावी, दलाला मार्फत शेतजमिनीची खरेदी त्वरित थांबविण्यात यावी, परसोडा व कोठोडा बु या दोन्ही ग्रामपंचायतीच्या नव्याने एनओसी घेण्यात याव्या, कंपनी परिसरातील स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, परसोडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची कंपनी वाहतुकीमुळे झालेली दुरवस्था लक्षात घेता दुरुस्ती करण्यात यावी, पेसा क्षेत्रातील पायमल्ली करणारे कंपनी अधिकारी व जबाबदार प्रशासन यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ग्राम पंचायतने निर्देश दिलेल्या विषयाचे काटेकोरपणे पालन करावे आदी मागण्या प्रकल्पग्रस्तांनी कंपनी व जिल्हा प्रशासनाकडे करून 16 ऑक्टोबर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अन्नत्याग आंदोलनाला दहा दिवसाचा कालावधी होऊनही जिल्हाप्रशासन, कंपनीप्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांच्या न्यायीक मागण्यांकरीता प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांनी उभारलेल्या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष दिसून येत आहे. उपोषणाला दहा दिवसाचा कालाधी होऊनही प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या पूर्ण झाल्या नाही.त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. काटकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)