आक्सापूर ते चिंतलधाबा उर्वरित रस्ता दुरुस्ती वर्षभरात:- मंत्री रवींद्र चव्हाण #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
चंद्रपूर:- बामणी-राजुरा महामार्गावरील आक्सापूर ते चिंतलधाबा या मार्गाची अतिवृष्टीमुळे झालेल्या दुरावस्थेनंतर या मार्गावर दुरुस्ती करण्यात येत आहे. साडेसहा किलोमीटर लांबीच्या रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे वर्षभरात पूर्ण करण्यात येईल.
याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असलेल्या रस्त्यांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
यासंदर्भात सुभाष धोटे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, आक्सापूर ते चिंतलधाबा प्रजिमा- 24 या रस्त्याची एकूण लांबी 7.5 किलोमीटर आहे. या रस्त्यावर 6.5 किलोमीटर लांबीमध्ये रुंदीकरण व मजबुतीकरण तसेच डांबरीकरणाचे काम मार्च 2023 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेली रस्त्यांची संबंधित कंत्राटदारांकडून दुरुस्ती करण्यात येत आहे. उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे कार्यारंभ आदेश 4 ऑक्टोबर 2023 रोजी देण्यात आले असून हे काम ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
वरोरा-चंद्रपूर-बामणी या राज्यमार्गावरील बल्लारपूर ते बामणी ही 13.800 किलोमीटर लांबीचा रस्ता खासगीकरणांतर्गत प्रकल्पामध्ये समाविष्ट असून, त्याची देखभाल व दुरुस्तीची कामे संबंधित कंत्राटदारांकडून करुन घेण्यात आली असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.