क्षुल्लक कारणातून शिवाची हत्या; आठ जण अटकेत #chandrapur #arrested #murder

Bhairav Diwase
0


शिवसेना (उबाठा) गटाच्या परिवहन सेनेचा जिल्हाध्यक्षही आरोपी

चंद्रपूर:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे युवासेना शहर प्रमुख शिवा मिलिंद वझारकर हत्येप्रकरणी उबाठा गटाचा परिवहन सेनेचा जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रेती तस्करीच्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा सुरू आहे.


स्वप्नील चंद्रकांत काशीकर (३८), रिझवान अजहर पठाण (३०), नाजीर रफिक शेख (२१), हिमांशू देवानंद कुमरे (२३), सुमीत संतोष दाते (२६), रोहित कृष्ण पितरकर (२३), चैतन्य उर्फ लाला सुनील ऑस्कर (१८), अन्सार अलिमखान पठाण (२४) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.


हिमांशू कुमरे, स्वप्नील काशीकर, शिवा वझरकर हे तिघेही मित्र होते. मागील काही दिवसांपूर्वी हिमांशू कुमरे व शिवा वझरकर यांच्यामध्ये कारणावरून वाद झाला. दरम्यान, हिमांशूने शिवाला भ्रमणध्वनीद्वारे स्वप्नील काशीकरचे कार्यालयात गाठले. यावेळी हिमांशू व शिवा यांच्यात जुन्या वादावरून वाद सुरू झाला. वाद टोकाला गेला. हिमांशूने शिवावर धारदार शस्त्राने वार केले. हिमांशूचे साथीदारही होते. त्यांनीही शिवाला मारहाण केली.


शिवाच्या मित्रांनी घटनास्थळ गाठून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिवाला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी ३०२, १४३, १४७, १४८, १४९ भादंवि १३५ अन्वये गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश मुळे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)