रामटेक:- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना भरभरून दिले. विश्वास केला, खाली बसलेल्यांना खुर्चीत बसवले, आपले समजून तोंडचे भरवले पण काहींना जास्त दिल्यामुळे पचले नाही. या सर्व गद्दारांना येत्या निवडणुकीत शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे केला. स्त्री शक्ती संवाद यात्रेचा आज शुभारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
शिवसेना महिला आघाडीच्यावतीने विदर्भात स्त्राr शक्ती संवाद यात्रा सुरू असून आज रामटेकच्या कन्हान येथील जनसंपर्क कार्यालयात महिला पदाधिकारी आणि महिला शिवसैनिकांची बैठक झाली. यावेळी उपनेत्या रंजना नेवाळकर, राजूल पटेल, विधानसभा प्रमुख विशाल बरबटे, शिल्पा बोडके, मंदाकिनी भावे, उत्तम कापसे, वंदना लोणकर, अलका दलाल, कैलास खंडार उपस्थित होते. गुरुवारी हिंगणा, उमरेड, कामठी तर शुक्रवारी भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर या मतदारसंघात संवाद यात्रा जाणार आहे.