चंद्रपुरात मिथेनचे मोठे साठे, पेट्रोल डिझेलला ठरणार पर्याय #chandrapur #Nagpur

Bhairav Diwase

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती


नागपूर:- पेट्रोल डिझेलला पर्याय ठरू पाहणाऱ्या मिथेनचे साठे चंद्रपूरच्या भद्रावती मध्ये आहे. त्याचा सुद्धा उपयोग औद्योगिक वाढीसाठी होईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. नागपूरमध्ये एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.


ते म्हणाले की, विदर्भाला सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी औद्योगिक विकास महत्त्वाचा आहे याच हेतूने विदर्भातील औद्योगिक क्षमता विकसित करणे ,तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्टार्टअप्स आणि उद्यमशीलतेला चालना देणे, विक्रेता विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून देणे, रोजगारासाठी नवकल्पना आणि पोषक वातावरण निर्माण करणे आणि यशस्वी उद्योजकाच्या यशोगाथा प्रदर्शित करण्यासाठी नागपूर मध्ये येत्या 27 ते 29 जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


यावेळी नितीन गडकरी यांनी विदर्भातील कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता वर्धा येथे होत असलेल्या सिंदी ड्राय पोर्टचे महत्व अधोरेखित केले. कापसाच्या गाठीची थेट बांग्लादेशला हल्दीया बंदराच्या माध्यमातून वाहतूक झाल्यास विदर्भातील कापूस उत्पादकांचा वाहतूक खर्च वाचेल आणि त्यांना प्रतिक्विंटल आर्थिक लाभ होईल. कुही येथे अडीच हजार एकर जमीन ही एमआयडीसीची असून या जमिनीवर जर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी उपलब्ध केले तर येथे पेट्रोल रिफायनरीचीही क्षमता निर्माण होईल.


बुटीबोरीत मदर डेअरीचा साडेचारशे कोटीचा प्रकल्प होणार असून नागपुरात असणारे विविध उद्योग समूह चांगली कामगिरी करत आहे, असे त्यांनी सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था , व्हिएनआयटी, आय आयएम तसेच इतर शैक्षणिक संस्थांचा देखील या औद्योगिक महोत्सवात सहभाग राहणार असून इंडस्ट्री -अकॅडमी कनेक्ट यांच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या उद्योगाबद्दल माहिती मिळणार आहे. तीन दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवात विदर्भातील सर्व जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.