Top News

मद्यपी चालकाला वाचविण्याचे पोलिसांचे प्रयत्न निष्फळ #chandrapur

चंद्रपूर:- बेधुंद अवस्थेत असलेल्या मद्यपी वाहनचालकाला वाहतूक पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नेताना त्याची प्रकृती खालावली. दरम्यान, त्याला रुग्णालयात भरती केले. मात्र, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने मद्यपी चालकाला वाचविण्याचे पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले. ही घटना रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. सचिन रत्नाकर गोजे (४४) रा. पठाणपुरा असे मृताचे नाव आहे. मागील आठवडाभरापूर्वीच तो दारू व्यसनमुक्ती केंद्रातून आला असल्याची माहिती आहे.


रविवारी गांधी चौकात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी वाहतूक पोलिसांची चमू बंदोबस्तात होती. दरम्यान, सचिन गोजे बेधुंद अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी त्याला विचारणा केली. मात्र तो शुद्धीतच नसल्याने कोणतीच माहिती देऊ शकत नव्हता. पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांची शोधशोध सुरू केली. दरम्यान त्याच्या गाडीच्या नंबरवरून त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना माहिती दिली. तसेच त्याला वाहतूक कार्यालयात आणले. त्याची अवस्था बघून त्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती शहर पोलिसांना दिली. शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अतुल स्थूल करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने