चंद्रपूर:- महाराष्ट्राचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर व वर्धा मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कुशल नेतृत्वात युवकांच्या भविष्याचा वेध घेणारे ॲडव्हॉन्टेज चंद्रपूर-२०२४ या इंडस्ट्रीयल एक्सपो ॲन्ड बिजनेस कॉन्क्लेवचे आयोजन करण्यात आले. या कॉन्क्लेवमध्ये नविन उद्योग येणार नसुन आल्यास त्यात स्थानिक रोजगार मिळणार नसल्याचे वक्तव्य युवक कॉंग्रेसच्या नेत्या तथा विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी केले आहे.
त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आकडयांसहीत शिवानी वडेट्टीवार यांची पोलखोल केली. ते म्हणाले की या दोन दिवसाच्या कॉन्क्लेवमध्ये १९ उद्योग समुहांनी अंदाजे ७५ हजार कोटी रूपयांचे सांमजस्य करार केले. यात प्रामुख्याने आर्सेलर मित्तल, लॉयड मेटल्स, अंबुजा सिमेंट, ग्रेटा ग्रुप, अरबिंदो रियलिटी, राजुरी स्टील, सनफ्लॅग या व इतर कंपन्यांचा समावेश आहे. यामुळे हजारों युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. प्रत्यक्ष रोजगाराबरोबर त्या उद्योग समुहाच्या आजूबाजूला असणा-या लोकांना अप्रत्यक्ष रोजगार यामुळे मोठया प्रमाणात उपलब्ध होणार आहे. कदाचित शिवानीताई वडेट्टीवार यांचा या विषयात अभ्यास कमी असावा असाही टोला श्री. देवराव भोंगळे यांनी मारला.
नुकताच चंद्रपूरात ताडोबा महोत्सव अतिशय उत्साहात पार पडला. ना. मुनगंटीवार यांच्या दुरदर्शी नेतृत्वात हा महोत्सव चंद्रपूरला जागतीक स्तरावर घेऊन गेला. या उत्सवात अनेक देशांच्या विश्वसुंदरी आल्या होत्या. त्यांच्यामुळे या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा जगात कोटयावधी लोकांनी एकाच वेळेला पाहण्याचा आनंद लुटला. याच बरोबर राष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द असणारे गायक, कवी, कलाकार या कार्यक्रमात आपली हजेरी लावून गेले. या कार्यक्रमाचा आस्वाद हजारों लोकांनी प्रत्यक्षरित्या घेतला. या महोत्सवाच्या निमीत्ताने जिल्हयातील पर्यटनाला जबरदस्त चालना मिळेल व अनेकांना रोजगार मिळेल. या व्यतिरिक्त ना. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरील वनअकादमी, सैनिक स्कुल, बॉटनिकल गार्डन, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, टाटा कॅन्सर हॉस्पीटल, कृषी महाविद्यालय, अनेक गावांमध्ये बसस्थानके, कृषी विभागाशी संबंधित अनेक प्रकल्प, एसएनडीसी महाविद्यालय, बांबु रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग सेंटर जिल्हयात अनेक ठिकाणी वाचनालये, प्राथमिक आरोग्य केंद्र या व अश्या अनेक प्रकल्पांना चालना मिळाली, असेही श्री. देवराव भोंगळे म्हणाले.
शिवानी वडेट्टीवार यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना देवराव भोंगळे म्हणाले, मागील अनेक वर्षापासून आमदार, मंत्री तथा पालकमंत्री व आता विरोधी पक्षनेते असणारे विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ब्रम्हपूरी मतदार संघात किती युवकांना रोजगार दिला याची माहिती दिल्यास आपल्या आरोपातील फोलपणा सिध्द होईल. दुस-यावर टिका करताना स्वतः काय केले याचे सिंहावलोकन करणे आवश्यक असते. ‘लोकासांगे ब्रम्हज्ञान व स्वतः असे कोरडे पाषाण’ असा भाव असणा-याने दुस-यांवर टिका करताना शंभरदा विचार करावा. आगामी निवडणूकांच्या तोंडावर अश्याप्रकारे स्टंटबाजी करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून लोकांची कामे करावी, ब्रम्हपूरी विधानसभेतील युवकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेळ घालवावा असा घणाघात देवराव भोंगळे यांनी केला.