जळगाव:- एका जिममध्ये व्यायाम केल्यानंतर पाणी पित असतांना तरुणाला हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना १६ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रोहित जगदीश जाखेटे (वय ४२, रा. लेक साईट, मेहरून तलाव परिसर जळगाव)असे मयत तरुणाचे नाव आहे. रोहित हा नित्यनियमाप्रमाणे गुरुवारी दि. १६ मे रोजी सकाळी पावणे सात वाजता रामदास कॉलनी परिसरातील आकार जिम येथे व्यायाम करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी व्यायाम झाल्यानंतर पाणी पीत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला.
तात्काळ त्याच्या सहकाऱ्यांनी रोहित याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून मयत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.