चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील तलावाजवळ असलेल्या देशी दारू भट्टीसमोर शनिवारी दि. ११ मे ला सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान दीड हजार रुपये घेतल्याच्या कारणावरून वाद करून मित्राने आपल्या मित्रालाच जमिनीवर निपचित पडेपर्यंत लाथाबुक्क्याने मारहाण केली अन् पसार झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
सूरज जयस्वाल (४०, रा. घुग्घुस) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर ऊर्फ संतोष कुंडावार (३६, रा. घुग्घुस) याला अवघ्या अर्ध्या तासात बेड्या ठोकल्याची माहिती सुधाकर यादव यांनी दिली.
सविस्तर वृत्त असे की, शनिवारी घुग्घुसमधील भट्टीसमोर ६.३० वाजताच्या दरम्यान सूरज व संतोष दोघे एकत्र आले. यावेळी दीड हजार रुपये घेतल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी सूरजला संतोषने लाथा-बुक्क्यानी मारहाण केली. दरम्यान, सूरज जागेवर निपचित पडताच संतोष घटनास्थळावरून पसार झाला.
याबाबतची माहिती घुग्घुस पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी लगेच आपल्या तपासाची चक्रे गतीने फिरवून सागर ऊर्फ संतोष कुंडावार याला अटक केली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी दिली.
घटनेची माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांना मिळताच त्यांनी लगेच घटनास्थळ गाठले. यासोबतच चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनीसुद्धा घटनास्थळ गाठले. पंचनामा करून लगेच आरोपीला अटक केली. घटनेचा पुढील तपास घुग्घुस पोलिस करीत आहेत.