चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुरूवारी (दि ६) सायंकाळी वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. गुरुदास मनिराम गेडाम (वय ४२, रा.गोवर्धन) आणि वैभव देवेंद्र चौधरी(वय २१, रा.शंकरपूर हेटी) अशी मृतांची नावे असून नीळकंठ भोयर (रा.तळोधी, मोकासा) व लेकाजी नैताम (रा.मारोडा) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चामोर्शी तालुक्यात आज सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळ आले. त्यानंतर मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. याच सुमारास गोवर्धन येथील गुरुदास गेडाम हे वैनगंगा नदीच्या काठावर लाकडी नाव बनवत होते. एवढ्यात त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले. दुसऱ्या घटनेत शंकरपूर(हेटी) येथील वैभव चौधरी या युवकावरही वीज कोसळली. त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आणखी एका घटनेत तळोधी येथील नीळकंठ भोयर आणि लेकाजी नैताम हे वीज पडल्याने जखमी झाले. त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुनघाडा व तळोधी परिसरात वादळ आणि त्यानंतर जोरदार पाऊस आल्याने अनेकांच्या घरांवरील छताचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.