चंद्रपूर:- संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्याला पुराचा तडाखा बसला आहे. या पूरग्रस्त गावांना राज्याचे वने , सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार भेट देणार आहेत. भेट देण्यापूर्वीच ना. श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला आवश्यक ते निर्देश दिले होते.आता ना. मुनगंटीवार प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांची पाहणी करणार आहेत
बुधवार, २४ जुलै २०२४ रोजी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार हे चिचपल्ली येथे पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते पिंपळखुटा गावाची पाहणी करतील. या दोन्ही गाावात पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती ते प्रशासन व ग्रामस्थांकडून घेणार आहेत.
गुरुवार, २५ जुलै २०२४ रोजी मुल तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या प्रश्नांबाबत त्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. मुलच्या तहसील कार्यालयात ना. श्री. सुधीर मुनगंटीवार हे मुलमधील पूरग्रस्त गावांमधील समस्या व सद्य:स्थितीची माहिती घेणार आहेत. याच दिवशी ते पोंभुर्णा तालुक्यातील पूरग्रस्त गावांबाबत बैठक तहसील कार्यालय पोंभुर्णा येथे घेणार आहेत. जुनासुर्ला येथील पुरग्रस्त भागाची पाहणी करतील.
पुरामुळे चंद्रपुरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी शिरल्याची माहिती मिळताच ना. श्री. मुनगंटीवार यांनी स्वत: अधिकाऱ्यांशी संपर्क साधत पहाटेपासूनच यंत्रणेला कामाला लावले होते. आता ते पुरामुळे नुकसान झालेल्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभे राहणार , असे त्यांनी यापूर्वीच सांगितले आहे.