DCM Ajitpawar: 'त्या' बातम्या राजकीय हेतूने प्रेरित! उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया #chandrapur #Mumbai - आधार न्युज नेटवर्क

आधार न्युज नेटवर्क

०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

सोमवार, जुलै २९, २०२४

DCM Ajitpawar: 'त्या' बातम्या राजकीय हेतूने प्रेरित! उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया #chandrapur #Mumbai


मुंबई:- "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजनेच्या खर्चासंबंधीच्या बातम्या या विसंगत आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवारांनी दिली आहे. तसेच वित्त विभागाच्या मान्यतेनंतरच आपण या योजनेची घोषणा केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना राज्याच्या वर्ष २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली. चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण ३५ हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार? हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे."

"राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही," असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया," असे आश्वासनही त्यांनी दिले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages