गोंदिया:- तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय भरतलाल रहांगडाले यांच्या आईच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने १ लाख ८२ हजार ४८ रुपये एका अज्ञात व्यक्तीने आपल्या खात्यात वळते केले.
ही घटना तिरोडा तालुक्यातील खमारी येथे घडली. तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या आई डेलनबाई भरतलाल रहांगडाले यांचे तिरोडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बचत खाते आहे. त्यांच्या खात्यावर अज्ञात व्यक्तीने ७४४१०१७५७० हा मोबाईल क्रमांक सक्रीय करून, युपीआयच्या आधारे खात्यातून ३ ते १६ जुलै दरम्यान १ लाख ८२ हजार ४८ रुपये आपल्या खात्यात वळते केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आमदाराचे स्वीय सहायक ढोरे यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान याप्रकरणी नागपूरयेथील रोशन शहारे (२७) या तरुणाला तिरोडा पोलिसांनी बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास नागपूर येथून अटक केली आहे. त्यांनी आपण गुगल पे च्या माध्यमातून हे पैसे आपल्या खात्यात वळते केल्याची कबुली तिरोडा पोलिसांना दिली आहे. पुढील तपास तिरोडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे करत आहेत.