उमरेड:- 'नेहमी मोबाईल पाहतो, अभ्यास का करीत नाही', अशा शब्दात हटकल्याचा राग आल्याने विळ्याने स्वतःचा गळा चिरून आत्महत्त्या केल्याची मन सुन्न करणारी घटना उमरेड येथे घडली आहे. मुलगा ११ व्या वर्गात शिक्षण घेत होता. या घटनेमुळे मुलाच्या वडिलाला मोठा मानसिक धक्का बसला.
Also Read:- आईने मोबाईल हिसकावल्याने तरुणीने घेतला गळफास
भिवापूर तालुक्यातील बोटेझरी येथील महेंद्र सहादेव म्हैसकर (वय ५१) हे उमरेड येथील बस स्टॅंडच्या मागे राहणारे सुरेश रामटेके यांच्या घरी भाड्याने राहतात. त्यांचा मुलगा अर्ष हा अकराव्या वर्गात विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. त्याला मोबाईल पाहण्याचे वेड होते. अभ्यास सोडून सतत मोबाईल पाहत असल्याने गुरूवारी रात्री महेंद्र अर्षवर रागावले होते.
वडील रागावल्याने अर्षने रागाच्या भरात बाथरूमध्ये जाऊन विळ्याने गळा कापून घेतला. वाराने नसा कापल्या जाऊन मोठा रक्तस्त्राव झाला आणि अर्षचा मृत्यू झाला. शुक्रवारी ही भयंकर घटना उघडकीस आली. मुलाने उचललेल्या टोकाच्या पावलाने महेंद्र यांना मोठा मानसिक धक्काच बसला. आपल्या बोलण्याचा एवढा विपरीत परिणाम होईल, याची त्यांनी कल्पनाही केली नसावी.
मुलांमधील संयम दिवसेंदिवस कमी होत असून मुलांना हाताळताना पालकांची कसरत करावी लागत असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे. महेंद्र म्हैसकर यांच्या तोंडी तक्रारीवरून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दिनेश खाटोले पुढील तपास करीत आहेत.