मुल:- मुल गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या शेतशिवाराच्या परिसरात गुरे आणि शेळयांना चारा चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना काटवन बिटाच्या बफर झोन कम्पार्टमेंट नंबर ७५६ मध्ये गुरूवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान चिचोली येथे घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली. मूल तालुक्यातील दोन महिण्यातील ही सहावी घटना आहे. मृतक गुराख्याचे नाव देवा वारलू राऊत वय ६५ वर्ष रा. चिचोली, असे आहे. मूल पासून हा परिसर तीन किमीच्या अंतरावर आहे. देवाजी राऊत यांना चिचोली येथे एक एकर शेती आहे.
शेती करण्यासोबत ते गावातील गुरे आणि शेळया राखण्याचे काम करतात. याच परिसरात त्यांची शेती आहे. शेतीच्या परिसरात गुरे आणि शेळया चारण्याचे काम करतात. हा परिसर झुडपी जंगलाचा आहे. त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने देवाजी राऊत यांच्यावर हल्ला केला. फरफरट नेऊन त्यांना जागीच ठार केले. त्यांच्या सोबत असलेले गुराखी भाऊजी नेवारे यांनी गावात येऊन घटना सांगितली. तात्काळ बफर झोनच्या वनविभागाला माहिती देण्यात आली. झुडपी जंगलात देवाजीचा मृतदेह आढळून आला. पंचनामा करून त्यांचा मृतदेह मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.
घटनास्थळी बफर झोनचे वनपरिक्षेत्राधिकारी राहूल कारेकर, पोलिस निरिक्षक सुमीत परतेकी, क्षेत्र सहायक गजानन वरगंटीवार, वनरक्षक बंडू परचाके यांनी भेट दिली.