Press Conference: आज महाराष्ट्र-झारखंड निवडणुकीची घोषणा

Bhairav Diwase
नवी दिल्ली:- महाराष्ट्र -झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करतील अशी शक्यता आहे. आयोगाने या निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ येत्या 26 नोव्हेंबरला संपणार आहे. याआधीच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळही 5 जानेवारी 2025 ला संपणार आहे. या राज्याच्या निवडणुकीचीही घोषणा आजच होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त 50 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सरकारमध्ये महायुती भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सहभागी आहेत. महायुतीचा सामना महाविकास आघाडीशी होणार आहे. या आघाडीत शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट सहभागी आहेत. या दोन्ही आघाड्यांतील राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. जागावाटपाच्या चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. निवडणूक आयोागकडून निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर या राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या लवकरच जाहीर होतील अशी शक्यता आहे.