चंद्रपूर:- गाव शिवारात जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या एका ७८ वर्षीय वृद्धावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना भद्रावती तालुक्यातील कोंडेगाव शिवारात आज बुधवारी (दि.३०) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. श्रीराम मडावी (वय ७८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये वाघाची चांगलीच दहशत पसरली आहे. भद्रावती तालुक्यातील कोंडेगाव हे जंगल व्याप्त गाव आहे. आज बुधवारी घटनेच्या दिवशी मृत श्रीराम मडावी हे गावालगतच्या शिवारात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. चारा काढत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस व वन विभागाचे अधिकारी करीत आहे.