गडचिरोली:- गावात सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करीत असताना काँक्रिट मिक्सरमध्ये हात सापडल्याने एका युवा मजुराचा मृत्यू झाला. ही घटना दि. 28 डिसेंबरला दुपारी दीड वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील बडीमादे या गावात घडली. कैलास ब्रिजलाल पुळो (२५) रा. बडीमादे असे मृत युवकाचे नाव आहे.
बडीमादे गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पुणे येथील राजन अँड राज कंपनीतर्फे ११२ मीटर लांबीचा सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करण्यात येत आहे. कंपनीमार्फत आंधळी येथील पेटी काँट्रॅक्टर महेश लाडे हे काम करीत आहेत. रस्ता तयार करण्यासाठी काँक्रिट मिक्सर मशिनचा एक नट निघाला. तो पकडत असताना कैलास पुळो याचा उजवा हात मशिनमध्ये अडकला.
मशिन सुरु असल्याने हातासह संपूर्ण शरीर मशिनमध्ये गुंडाळले गेले. त्यामुळे कैलासचे डोके आणि पायाला गंभीर दुखापत झाली. छातीच्या बरगड्याही तुटल्या. तात्काळ कैलासला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. कोरची पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. मृत युवकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.