Fire News: वीज वितरण कंपनीच्या पॉवर स्टेशनला भीषण आग

Bhairav Diwase

वर्धा:- वर्धा मार्गांवरील आर्वी येथील 132 केव्हीच्या वीज वितरण कंपनीच्या पॉवर स्टेशनला आग लागली. ही आग सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास लागली. त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.


आर्वी येथील १३२ केव्ही क्षमतेच्या महापारेषण सबस्टेशनमध्ये आग लागण्याची घटना घडली असून, २५ केव्हीए क्षमतेच्या दोन ट्रान्सफॉर्मरपैकी एका ट्रान्सफॉर्मरला मोठी आग लागली आहे. यामुळे परिसरातील विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

महावितरण व महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. पुलगाव येथून विशेष अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून यंत्रणेच्या अंदाजानुसार पुढील एका तासात आगीवर नियंत्रण मिळवले जाईल.

आर्वी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे, तर आर्वी शहरातील पुरवठा पुढील काही तासांत पूर्ववत करण्यात येईल. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा ताकदीने कामाला लागलेली आहे.

या घटने संदर्भात माझी महापारेषणचे संचालक व अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा झाली असून सर्व वरिष्ठ स्तरावर स्थिती पूर्ववत होण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना आमदार सुमीत वानखेडे यांनी दिल्या आहेत.