भद्रावती (जितेंद्र माहुरे भद्रावती प्रतिनिधी):- येथील लोकमान्य विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनींचा विद्यालयातच्या प्रांगणात नुकताच सत्कार करण्यात आला. यंदाचे वर्ष हे लोकमान्य विद्यालयाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.या या पार्श्वभूमीवर विद्यालयातर्फे विविध क्षेत्रात विद्यालयाचे नावलौकिक उंचावणाऱ्या माजी विद्यार्थीनींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्र सेविका समिती चंद्रपूरच्या बौद्धिक प्रमुख अश्विनी दाणी, लोकसेवा मंडळाचे सहसचिव अमित गुंडावार, शाळा समितीचे अध्यक्ष उल्हास भास्करवार, संचालक अविनाश पाम्पट्टीवार, सेवानिवृत्त प्राचार्या आशालता सोनटक्के, माजी प्राचार्य विनोद पांढरे, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे आणि पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे प्रभृती मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम अश्विनी दाणी यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करुन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा.स्वाती गुंडावार यांनी शारदा स्तवन म्हटले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या विद्यार्थ्यिनींनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले. यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अश्विनी दाणी यांचा चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात विद्यालयाचे नाव उंचावणाऱ्या मेहरुनिसा शेख, मोनाली बतकी, साक्षी अतकरे, प्रणिता भाकरे व शिवानी पांढरे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व सत्कारमूर्तींनी आपल्या सत्काराला उत्तर देताना विद्यालयाप्रती कृतज्ञत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशालता सोनटक्के यांनी केले.संचालन प्रा. स्वाती गुंडावार यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे यांनी मानले.