Sharp knife attack : घरात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला

Bhairav Diwase
वणी:- शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन वाद घालून एका तरुणावर गुन्हेगारी पार्श्वभूमिच्या तरुणाने धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित तरुणाचा गळा चिरला जाऊन तो गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. ही गंभीर घटना वणी येथील माळीपुरा परिसरात रविवार १ डिसेंबरला सकाळी घडली.

प्रणय मुकूंद मुने (२१) रा. माळीपुरा वणी असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज आरोपी अजिंक्य संतोष चौधरी (२४) रा. हिंगणघाट त्याच्याकडे आला. 

यावेळी प्रणय हा घरी एकटाच होता. संभाषणादरम्यान त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. त्यामध्ये प्रणयने त्याला शिवीगाळ केली. त्यावर संतप्त झालेल्या अजिंक्यने कमरेत खोसून असलेला धारदार चाकू काढला. त्यानंतर प्रणयवर चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात त्याचा गळा चिरला जाऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याची आरोळी ऐकून शेजारी राहणारी महिला धावून गेली.

यावेळी रक्तरंजित थरार पाहून तिने प्रणयच्या घराचे दार बाहेरून लावून घेतले. तसेच शेजारी नागरिकांना गोळा केले. त्यानंतर नागरिकांनी दार उघडून आरोपीला ताब्यात घेतले. शिवाय तत्काळ प्रणयला उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेले. यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. घटनेनंतर नागरिकांनी वणी पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. तसेच हल्लेखोराला पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.