Fake cheese: चंद्रपुरात दीड लाखांचे बनावट पनीर जप्त

Bhairav Diwase

चंद्रपूर:- पनीरच्या नावाखाली चक्क चीज ॲनालॉग नावाच्या घातक पदार्थाची चंद्रपुरात विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव शुक्रवारी (दि. ७) धाडसत्रातून पुढे आले. अन्न व औषध प्रशासनाने दोन वेगवेगळ्या कारवाईत तब्बल १ लाख ५० हजार २०० रुपयांचा (४७२ किलो ग्रॅम) पनीर साठा जप्त केला आहे.


अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी जी. टी. सातकर यांनी बुधवारी (दि. ५) चंद्रपूर येथील सपना डेली निड्सची तपासणी केली. त्यावेळी या दुकानात चीज अॅनालॉग हा अन्नपदार्थ पनीर म्हणून विक्री करीत असल्याचे समोर आले. पथकाने दुकानातून ५१ हजार २०० रुपये किमतीचा १९७ किलो ग्रॅम साठा जप्त केला. गोलबाजार परिसरातील तिलक मैदानात न्यू भाग्यश्री घी भंडारातून ९९ हजार रुपये किमतीचा पनीर म्हणून विक्री केला जाणारा २७५ कि.ग्रॅ. चीज अॅनालॉग हा घातक पदार्थ जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने चंद्रपुरातील विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने दुग्धजन्य पदार्थ व पनीर आदी पदार्थाचा डिमांड वाढला. त्यामुळे काही विक्रेते भेसळ करून विक्री करण्याची शक्यता आहे.