Murder News: क्षुल्लक कारणावरून तरुणाची निघृण हत्या

Bhairav Diwase

यवतमाळ:- क्षुल्लक कारणावरून एका २७ वर्षीय तरूणाची धारदार शस्त्राने वार करीत निघृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना शहरातील लोहारा एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेत रविवारी घडली असून सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
विनोद शंकर शिपलेकर रा. उद्योग नगर, लोहारा असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील उद्योग नगर परिसरात राहणारा विनोद शिपलेकर हा हमाली करून उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या जेवणाची व्यवस्था घरापासून काही अंतरावर राहणारी बहिणी करीत होती. अशात रविवारी रात्री जेवण करून तो घराच्या दिशेने निघाला होता. यावेळी दोन तरूणांनी विनोद याच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात त्या दोघांनी विनोद याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. घटनेनंतर हल्लेखोरांनी पळ काढला. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेला मृतदेह सोमवारी सकाळी परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आला. याची माहिती लगेच लोहारा पोलिसांना देण्यात आली.

घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार मुनेश्‍वर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे, एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांनीसुद्धा घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करीत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदाकरीता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.

या प्रकरणी कमलेश सूर्यभान वाठोरे यांनी लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला. या प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास लोहारा पोलिस करीत आहे.