Gadchiroli Police : कवंडेतील नक्षली स्मारके केली उद्ध्वस्त

Bhairav Diwase


भामरागड:- भामरागड उपविभागातील कवंडे येथे पोलिसांनी रविवार (ता. ९) रोजी नक्षल्यांची स्मारके उद्‌ध्वस्त केली. अतिसंवेदनशील अशा कवंडे येथे याच दिवशी अवघ्या २४ तासांत नवीन पोलिस स्टेशनची उभारणी व उद्‌घाटन करण्यात आले हाेते. कवंडे येथे नवीन पोलिस स्टेशन उभारणीच्या कार्यवाहीदरम्यान मिडदापल्ली ते कवंडे रत्यावर पोलिस स्टेशन निर्मितीच्या आधीच्या काळातच माओवाद्यांनी स्मारके बांधलेली असल्याचे गडचिरोली पोलिस दलाच्या निदर्शनास आले होते. सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि परिसरात आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी माओवाद्यांकडून या स्मारकांची निर्मिती करण्यात आली होती.


त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गडचिरोली पोलिस दलाच्या बीडीडीएस व विशेष अभियान पथकातील जवानांनी या परिसरात शोध अभियान सुरू केले. यादरम्यान मिडदापल्ली ते कवंडे रत्यावर तसेच कवंडे पोलिस स्टेशनच्या शेजारील परिसरात एकूण ४ स्मारके माओवाद्यांनी बांधलेली असल्याचे दिसून आले. या माओवादी स्मारकांची व परिसराची बीडीडीएस पथकाने कसून तपासणी केली व त्यानंतर विशेष अभियान पथकातील जवानांनी माओवाद्यांनी बांधलेली सर्व स्मारके उद्ध्वस्त केली.

माओवाद्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम भागांमध्ये पेनगुंडा व नेलगुंडा, कवंडे पोलिस स्टेशनची स्थापना करून तसेच माओवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त करून गडचिरोली पोलिस दलाने परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश व अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. व्ही. सत्यसाई कार्तिक, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात पार पाडली.

यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, या भागात माओवादविरोधी अभियान तीव्र केले असून माओवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. यासोबतच अशा माओवाद्यांच्या स्मारकाला समाजात कुठेच स्थान नसून कोणीही अशा बेकायदेशीर बांधकामामध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले आहे.