नवी दिल्ली:- काँग्रेसचे खासदार राहुल गांधींसोबत 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या महिला काँग्रेसच्या 22 वर्षीय कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सूटकेसमध्ये हिमानी यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
हरियाणामधील रोहतक येथील सांपला बस स्टँडजवळ एका सूटकेसमध्ये हिमानी यांचा मृतदेह आढळला. गुन्हेगारांनी बस स्टँडजवळ रस्त्याच्या कडेला मृतदेह फेकून दिला होता. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून, काही पथकं देखील नेमली आहेत.
शनिवारी (1 मार्च) काही नागरिकांना सांपला बायपासजवळ रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत एक सूटकेस पडल्याचे दिसले. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. सूचना मिळताच सांपला पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सूटकेस उघडताच सर्वांना धक्का बसला. या सूटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता व तिच्या तोंडातून रक्त वाहत होते. तपासामध्ये ही तरूणी काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी असल्याचे आढळून आले.
काँग्रेस आमदार बीबी बत्रा यांनी मृत युवती काँग्रेस कार्यकर्ता असल्याची माहिती दिली. हिमानी नरवाल या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रिय होत्या. त्या एनएसयूआयच्या नेत्या राहिल्या आहेत. त्या रोहतक शहरातील विजय नगर येथील रहिवासी होत्या व त्यांनी वैश्य कॉलेजमधून एमबीए आणि कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते.
या घटनेनंतर आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. तसेच, या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी देखील यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच, या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे आणि दोषींना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.