
यवतमाळ:- धारदार शास्त्राने वार करून युवकाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह दोरीने बांधून विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना दिग्रस तालुक्यातील धानोरा (बु.) येथील शेत शिवारात आज मंगळवारी (दि. २५) दुपारी उघडकीस आली.
शहरालगत असलेल्या देउरवाडा (पु) येथील रहिवासी शेख मुफित शेख मुस्ताक (वय २३) असे मृतकाचे नाव आहे. त्याचा मृतदेह धानोरा बु. येथील विलास किसन शेलकर यांच्या शेतातील विहिरीत कमरेला दोर बांधून आढळला. विहिरीच्या काठावर रक्ताचा सडा दिसल्याने शेतमालक शेलकर यांनी ही माहिती गावातील पोलीस पाटील गोविंद गावंडे यांना दिली.
यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचेसह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पाहणी केली असता विहिरीत मृतदेहाला दोरीने बांधून होता. तर पाण्यावर रक्ताचे थर दिसले. विहिरीतील पाणी मोटारपंपाने कमी करून बघितले असता त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राचे दोन वार व डोक्यावर एक वार दिसला. पोलिसांनी पंचनामा केला.
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी फॉरेन्सिक, फिंगरप्रिंट, डॉग युनिट यांना पाचारण करण्यात आले आहे. मृतकाचा भाऊ नदीम शेख मुस्ताक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.