गोंदिया:- वारस फेरफार नोंद घेण्यासाठी पैशांची मागणी करून ती कार्यालयातील खासगी इसमामार्फत स्वीकारल्याप्रकरणी ग्राम चिखली येथील महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली आहे. अश्विनी ठोंबरे असे महिला तलाठी तर ओंकार शेंडे (रा. कोहळीटोला) असे खासगी इसमाचे नाव आहे. अश्विनी ठोंबरे सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील तलाठी साजा क्रमांक १७ येथे कार्यरत आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराच्या आईचा मृत्यू झाल्याने सातबारा उतारावरून नाव कमी करून वारस फेरफार नोंद घ्यायची होती. यासाठी त्यांनी रीतसर कारवाईदेखील केली होती. मात्र वारस फेरफार नोंद घेण्यासाठी १ हजार रुपये लागतील असे सांगण्यात आले व तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता तलाठी ठोंबरे यांनी लाच स्वीकारण्याची इच्छा दर्शविली.
यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.८) दुपारी २:३० वाजता दरम्यान सापळा लावला व तक्रारदार लाच रक्कम देण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला असता तलाठी ठोंबरे यांनी रक्कम कार्यालयात काम करणाऱ्या खासगी इसम ओंकार शेंडे यांच्या मार्फत स्वीकारली असता पथकाने दोघांनी रंगेहात पकडले.