कोरपना:- कोरपना तालुक्यातील दुर्गाडी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणीदरम्यान ग्रामस्थांनी अवैध दारू विक्रीबाबत तक्रार केल्यानंतर राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी तत्काळ कारवाई केली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गाडी फाट्यालगत राष्ट्रीय महामार्गावरिल एका शेतात अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. या माहितीची गंभीर दखल घेत आमदार भोंगळे यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ठिकाणी धडक देत त्यांनी कोरपना पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत दोन पेट्या अवैध देशी दारू जप्त केली.
ही कारवाई ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी आमदार भोंगळे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, यापुढे अशा प्रकारची अवैध विक्री आढळल्यास त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी.
या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी आमदारांच्या या तत्परतेचे कौतुक केले असून, गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत केले आहे


