Suicide News: 'माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही' म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य

Bhairav Diwase

गडचिरोली:- 'माझे आवडते टीव्ही चॅनेल पाहू दिले नाही' असे म्हणत मोठ्या बहिणीशी वाद घातला. त्यानंतर घराच्या मागील बाजूस असलेल्या पेरूच्या झाडाला गळफास लावून दहा वर्षीय मुलीने आत्महत्या केली. खळबळ माजविणारी ही घटना कोरची तालुक्यातील बोडेना गावात गुरूवार (२२ मे) सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.

गळफास घेत आत्महत्या:

सोनाली आनंद नरोटे (वय १०,रा. बोडेना, ता. कोरची) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. गुरूवारी सकाळी संध्या (वय १२), सोनाली आणि तिचा भाऊ सौरभ (वय ८) हे तिघेही टीव्ही पाहत होते.

मोठ्या बहिणीसोबत झाला वाद:

दरम्यान, आवडते चॅनेल पाहण्यावरून व रिमोट हातात घेण्यावरून मोठी बहीण संध्या हिच्याशी सोनालीचे भांडण झाले. 'माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही' असे म्हणत रिमोट ताब्यात घेण्यावरून वाद झाला. त्यानंतर सोनालीला राग अनावर झाला. ती रागाच्या भरात घराच्या मागील बाजूस गेली. तिथे असलेल्या पेरूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

पंचनामा आणि पुढील तपास:

माहिती मिळताच कोरचीचे पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मृतदेह कोरची ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. तेथे डॉ. राहुल राऊत यांनी शवविच्छेदन केले. पुढिल तपास पोलीस करीत आहे.