भद्रावती:- लेंडारा तलाव परिसरातील आमराई भागात सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास वादळामुळे विद्युत तार तुटून शेताच्या कुंपणावर पडल्याने शॉक लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महादेव कृष्णाजी दरवरे वय ५५, रा. शिवरकर सोसायटी, भद्रावती असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
महादेव दरवरे हे नेहमीप्रमाणे संध्याकाळी आपले शेतकाम आटपून घरी परत येत असताना, लोखंडी कुंपण असलेल्या गेटजवळ आले. तेव्हा वादळामुळे विद्युत खांबावरील एक जिवंत विद्युत तार तुटून त्या कुंपणावर पडला होता. त्यामुळे संपूर्ण कुंपण विद्युत प्रवाहाने भारले गेले होते. दरवरे यांनी त्या कुंपणाला हात लावताच त्यांना तीव्र शॉक बसला आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती स्थानिकांनी तत्काळ वीज वितरण कंपनी व भद्रावती पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीकडे केली आहे.
इम्रान खान यांनी म्हटले की, "ही घटना निसर्गाच्या कोपामुळे घडली असली तरी मृतक कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी तत्काळ आर्थिक मदत व्हावी."
आधार न्युज नेटवर्क/ जितेंद्र माहूरे, भद्रावती