राजुरा:- राजुरा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कपाशी बियाण्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० मे २०२५ रोजी राजुरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, भुरकुंडा येथील नागो भीमा टेकाम यांच्या घरात प्रतिबंधित बीटी बियाण्यांचा साठा आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी टेकाम यांच्या घरावर छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांना एका प्लास्टिकच्या पिशवीत ९६ हजार रुपये किमतीचे ५० किलो एचटीबीटी बियाणे आढळून आले. पोलिसांनी टेकाम यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी हा माल सुकडपल्ली येथील तिरुपती नारायण अप्पलवार यांचा असल्याचे सांगितले.
पोलिसांनी तातडीने दोघांना ताब्यात घेतले आणि कृषी विभागाला या घटनेची माहिती दिली. कृषी अधिकारी श्री. नरेश रामकृष्ण ताजने यांनी या बियाण्यांची पडताळणी केली असता, ती प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणे असल्याचे स्पष्ट झाले. शासनाची फसवणूक करण्याच्या आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने हे बियाणे बाळगल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानंतर, दोन्ही आरोपींविरोधात राजुरा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री. पांडुरंग हाके, श्री. भिष्मराज सोरते, पोहवा विक्की निर्वाण, अविनाश बांबोळे, महेश बोलगोडवार, तिरुपती जाधव, शफीक शेख, शरद राठोड, आनंद मोरे, तसेच कृषी अधिकारी श्री. नरेंद्र ताजने आणि पंचायत समिती राजुरा यांनी केली.