Theft News: शाळेतून काढून टाकल्याच्या रागातून शाळेत केलेल्या चोरीचा अखेर छडा!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- दिनांक १७ मे, २०२५ रोजी अमर शहीद वीर भगतसिंग माध्यमिक शाळा, बंगाली कॅम्प येथील माध्यमिक विद्यालयाचे कार्यालय फोडून शाळेतील संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर (DVR) यासारखे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३९२/२०२५, कलम ३३१(४), ३०५ अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाची सूत्रे:

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक असिफराजा शेख यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार, शोध पथकाने कसून तपास सुरू केला.

गुन्हेगारांचा शोध:

तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, शाळेतून गैरवर्तणुकीच्या कारणावरून काढून टाकलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने त्याच्या एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने ही चोरी केली आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेतला.

गुन्ह्याची कबुली आणि मुद्देमाल हस्तगत:

त्यास त्याच्या पालकांसमक्ष ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, त्याच्या घरातून चोरलेले संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर मशीन यासह एकूण ४३,७००/- रुपये किमतीचे साहित्य काढून दिले. त्याने हे कृत्य त्याच्या अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने केल्याचेही कबूल केले.

अटक आणि पुढील कारवाई:

त्यानुसार, दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांना बालन्यायालयात सादर करण्यात आले आहे.

यशस्वी कारवाई करणारे पोलीस पथक:

पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस अंमलदार जितेंद्र आकरे, शरद कुडे, आनंद खरात, लालू यादव, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, सचिन गुरनुले, मनिषा मोरे, रविकुमार ढेंगळे, संदिप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार आणि ब्ल्युटी साखरे यांनी ही यशस्वी कारवाई केली.