No firing in Ghuggus: घुग्गुसमध्ये गोळीबार झाले नसल्याचा तज्ञांचा अहवाल प्राप्त!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ९ मार्च २०२५ रोजी पोलीस स्टेशन घुग्गुस हद्दीतील राजू रेड्डी यांच्या घरातील पहिल्या मजल्यावर भाड्याने राहणाऱ्या अनुपसिंग चंदेल यांच्या पोर्चमध्ये मिळालेल्या रिकाम्या काडतुसाच्या केस संदर्भात सुरू असलेल्या तपासात, घटनास्थळी गोळीबार झाला नसल्याचा तज्ञांचा स्पष्ट अहवाल प्राप्त झाला आहे. गोळीबाराची चिन्हे आढळली नाहीत.

या घटनेनंतर पोलीस स्टेशन घुग्गुस येथे अपराध क्रमांक ४४/२०२५ कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक टीम, बीडीडीएस पथक, स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके, श्वान पथक आणि आर्मोरर पथकाने घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी घटनास्थळी गोळीबार झाल्याचे कोणतेही चिन्ह दिसून आले नव्हते.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल निर्णायक:

पुढील फॉरेन्सिक पुष्टीसाठी, या गुन्ह्याच्या तपासादरम्यान बॅलेस्टिक तज्ञांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते. तसेच, घटनास्थळी मिळालेली रिकामी काडतुसाची केस फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली होती. आता उपसंचालक, प्रादेशिक न्यायवैद्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, नागपूर यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला असून, या अहवालात सदर ठिकाणी गोळीबार झाला नसल्याचा स्पष्ट अभिप्राय देण्यात आला आहे.

आजपावेतोच्या सखोल तपासातही घटनास्थळी गोळीबार झाल्याचे निष्पन्न झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. या अहवालामुळे घुग्गुसमधील या घटनेबाबतच्या अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.