Work stoppage movement: हातपंप दुरुस्ती कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा (यांत्रिकी विभाग) अंतर्गत कार्यरत असलेले जवळपास 62 ट्रायसेम हातपंप कर्मचारी 1986 पासून हातपंप दुरुस्तीचे काम करत आहेत. अत्यंत तुटपुंज्या वेतनावर हे कर्मचारी संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करत आहेत. मात्र, आजवर त्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यात आलेले नाही, जो त्यांच्यावर मोठा अन्याय आहे.

🛜
कर्मचाऱ्यांवर अन्याय आणि शासनाच्या निर्णयांकडे दुर्लक्ष?

शासनाने हातपंप दुरुस्ती कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत अनेक निर्णय आणि पत्रे चंद्रपूर जिल्हा परिषदेला पाठवली आहेत. ज्या जिल्हा परिषदांनी या कर्मचाऱ्यांना आपल्या आस्थापनेवर घेतले आहे, त्यांना वेतन, भत्ते आणि सेवानिवृत्ती वेतन देखील या निर्णयानुसार मिळत आहे. परंतु, चंद्रपूर जिल्हा परिषदेने या कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर न घेतल्याने, त्यांना या लाभांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

🛜
संघटनेने वेळोवेळी पत्रव्यवहार:

जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर घेण्याऐवजी केवळ निधी उपलब्ध करून देण्यासंबंधी पत्रव्यवहार केला. यामुळे 35 वर्षांची सेवा देऊनही या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे न्याय मिळू शकले नाही. संघटनेने वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कर्मचाऱ्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही.

🛜
बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय:

आपल्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने, सर्व हातपंप दुरुस्ती कर्मचाऱ्यांनी 20 मे 2025 पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामुळे उन्हाळ्याच्या काळात ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या उद्भवल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी चंद्रपूर जिल्हा परिषद यंत्रणेची राहील, असे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.