चंद्रपूर:- रामबाग मैदान वाचवण्यासाठी रविवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 7 वाजता रामबाग मैदानावर महापंचायतचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक भागातील तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिक, खेळाडू, सैन्य व पोलीस भरती करिता सराव करणारे युवक, योगा ग्रुप्स तसेच शहरातील विविध संस्था-संघटना यांनी मोठ्या संख्येने या महापंचायत मध्ये सामील होण्याचे आवाहन रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने आज शुक्रवार दिनांक 9 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केले.
यावेळी रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे सदस्य पप्पू देशमुख, राजेश अडूर, मंतोष देबनाथ, उमेश वासलवार, दिपक कामतवार, रविंद्र माडावर, गणेश झाडे, प्रशांत वाघमारे, अतुल बेजगमवार, प्रवीण वडलुरी, कोमिल मडावी, मनप्रीत सिंग, अमोल घोडमारे, सोहेल शेख, प्रफुल बैरम, अक्षय येरगुडे, रजनी पाॅल इत्यादी उपस्थित होते.
महापंचायतीच्या सुरुवातीला या मैदानावर प्रतीकात्मक स्वरूपात खेळाडू विविध खेळांचे, योगा ग्रुप योगासनाचे तसेच सराव करणारे युवक-युवती सरावाचे प्रदर्शन करतील. त्यानंतर मैदानावरच महापंचायत घेऊन चर्चा आयोजित केली जाणार आहे.
या चर्चेअंती महापंचायतीमध्ये ठराव घेण्यात येतील. सर्व लोकप्रतिनिधींना पत्र देऊन महापंचायतीमध्ये उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येईल अशी माहिती रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने पत्रकार परिषदेतून दिली.
जिल्हा परिषदेला रामबाग मैदानावरील नवीन जागेत 3399 चौरस मीटर म्हणजेच 36 हजार 587 चौरस फुटामध्ये चार मजली नवीन इमारतीचे बांधकाम करावयाचे आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडे जुन्या इमारतीच्या परिसरात जटपुरा गट नंबर 1 च्या शिट नंबर 21 मध्ये 8430.90 चौरस मीटर म्हणजेच जवळपास 90 हजार 750 चौरस फूट जागा उपलब्ध आहे. ही 900 फूट बाय 900 फूट अशी चौरस जागा आहे. दोन एकरच्या वर जागा जुन्या इमारतीच्या ठिकाणी उपलब्ध असतांना प्रदूषित शहरातील एकमेव निसर्गरम्य मैदान असलेल्या रामबाग मैदानावरच नवीन इमारतीचा आग्रह कशासाठी? असा आंदोलनकर्त्यांचा सवाल आहे. रामबाग बचाव संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत जागेची आखीव पत्रिका व नकाशा सादर केला.