Tiger Attack: तेंदूपत्ता तोडायला जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाची झडप; सासू सुनेसह एकीचा मृत्यू

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपुरातील सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल गावाशेजारच्या जंगलात ही घटना घडलीय. सिंदेवाही शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढा-माल गावातील या महिला गावातील अन्य महिलांसह तेंदूपत्ता तोडायला जंगलात गेल्या होत्या.
दुपार झाली तरी महिला घरी परत न आल्याने शोध घेण्यात आला. वनविभाग आणि स्थानिक गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर तिघींचे मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

मृतक महिलांमध्ये सासू-सुनेचा समावेश, कांता बुधाजी चौधरी (65-सासू), शुभांगी मनोज चौधरी (28-सून) आणि रेखा शालिक शेंडे (50) अशी मृत महिलांची नावं आहेत. सर्व मृतक मेंढा-माल येथील रहिवासी, वनविभागाने मौका पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्ट मॉर्टमसाठी सिंदेवाहीला रवाना करण्यात आले. 

वाघाने केलेल्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाल्याने घटनास्थळी तातडीने कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. हल्ला करणाऱ्या वाघिणीचा शोध सुरू आहे. वाघाने केलेल्या हल्ल्यात एकाच वेळी 3 लोकांचा जीव जाण्याची जिल्ह्यातील किंवा राज्यातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत.