चंद्रपूर:- अवैध मार्गाने कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ७२ गोवंश आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले ६ आयशर ट्रक असा एकूण १ कोटी ७० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १८ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २१ जून २०२५ रोजी चंद्रपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, काही ट्रक मधून जनावरे (गोवंश) यांचे हात, पाय, तोंड बांधून, कोणतीही योग्य व्यवस्था न करता क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गाई-बैल (गोवंश) यांना दाटीवाटीने भरून त्यांची कत्तलीसाठी तेलंगणा येथे अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. ही माहिती मिळताच धानोरा टोल नाका, घुग्घुस रोड येथे नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान, माहितीनुसार ६ आयशर ट्रक घुग्घुसच्या दिशेने येताना दिसले. पोलिसांनी पंचांसमक्ष या ट्रकची तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. वेगवेगळ्या ट्रकमध्ये जनावरांचे हात, पाय, तोंड बांधून अत्यंत क्रूरपणे आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गोवंश भरले होते. चालकांकडे या जनावरांच्या वाहतुकीची कागदपत्रे मागितली असता, त्यांनी भंडारा आणि गोंदिया येथून जनावरे खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या. मात्र, या पावत्यांची पडताळणी केली असता, त्यावर सरकारी अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असल्याचे निष्पन्न झाले. याचा अर्थ, बनावट कागदपत्रांच्या आधारे ही अवैध वाहतूक सुरू होती.
याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत ६ ट्रक, जनावरे वाहतूक करण्यासाठी वापरलेले पायलटिंग वाहन आणि एकूण ७२ गोवंश असा १ कोटी ७० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, या प्रकरणी एकूण १८ आरोपींविरुद्ध घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करण्यात आलेल्या या सर्व जनावरांना सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रपूर येथील प्यार फाउंडेशन, छोटा नागपूर यांच्याकडे सुरक्षितरित्या जमा करण्यात आले आहे.