बल्लारपूर:- पंधरा वर्षीय मुलगी जेवताना तोंडात घास घेईल इतक्यात सर्पदंशाने तिचा घात केला. ती अंगणातील खाटेवर बसून जेवत होती. तिचे पाय खाटेच्या खाली होते. याच दरम्यान विषारी सापाने तिच्या पायाला दंश केला. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पूर्वा अविनाश भलवे असे मृत मुलीचे नाव आहे. ती जिल्हातील बामणी येथील शिवनगर वार्डातील रहिवाशी होती.
वृत्तानुसार, बल्हारपूर तालुक्यात येणाऱ्या बामणी येथील पूर्वा भलवे ही आपल्या घरी (शनिवार) दुपारी दोन वाजताच्या सुमारास अंगणात खाट टाकून बसली होती. खाटेवर बसून ती जेवत होती. इतक्यात तिच्या पायाला विषारी सापाने दंश केला. सापाने दंश केल्याची माहिती होताच कुटुंबाने तिला तातडीने बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर झाली. पुढील उपचारासाठी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान तिचा दुदैवी मृत्यू झाला