चंद्रपूर:- महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील लाकडकोट येथील आरटीओ चेकपोस्टवर सुरू असलेल्या कथित वसुलीविरोधात आवाज उठवल्याबद्दल आम आदमी पक्षाचे (आप) चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्यावर विरूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्यावर खंडणीचा कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट केले आहे. काही माध्यमांनी खंडणीच्या आरोपांबाबत चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा दावा राईकवार यांनी केला आहे.
राईकवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक ट्रकचालक, लघु व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांकडून लाकडकोट चेकपोस्टवर आरटीओ विभागाकडून मोठ्या प्रमाणावर रोख वसुली केली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारींच्या आधारावर राईकवार आपल्या सहकाऱ्यांसह चेकपोस्टवर गेले होते. तेथे त्यांना आरटीओ अधिकारी योगिता राणे आणि कांबळे यांनी अडवले आणि त्यांचे वाहन सुमारे अडीच तास थांबवून ठेवले.
राईकवार यांच्या मते, आरटीओ अधिकाऱ्यांना आपण स्टिंग ऑपरेशन करत असल्याची भीती वाटत होती. या दरम्यान, वरिष्ठ अधिकारी आणि सात इतर आरटीओ इन्स्पेक्टर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी "येथे रोज लाखोंची वसुली केली जाते आणि ही व्यवस्था वरपर्यंत माहिती आहे," असे कबूल केल्याचा दावा राईकवार यांनी केला आहे.
या घटनेनंतर आरटीओ अधिकारी योगिता राणे यांनी विरुर पोलीस स्टेशनमध्ये राईकवार यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि हुज्जत घातल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली. एफआयआरमध्ये राईकवार यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे, जो आरोप राईकवार यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
आज राईकवार यांनी चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असता, पोलीस अधीक्षकांनी राईकवार यांच्याविरोधात खंडणीचा कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे स्पष्ट केले. केवळ महिला सरकारी कर्मचाऱ्याशी वाद आणि कामात अडथळा आणल्याबद्दल एफआयआर दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिल्याचे राईकवार यांनी सांगितले. कोणतीही आर्थिक वसुली किंवा खंडणीसदृश बाब झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या परिस्थितीमध्ये काही माध्यमांनी राईकवार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याची खोटी आणि अतिरंजित बातमी पसरवल्याचा आरोप राईकवार यांनी केला आहे, ज्यामुळे त्यांची समाजात बदनामी झाली आहे. राईकवार यांनी आपण ट्रकचालकांकडून कोणतेही पैसे घेतले नसून, केवळ जनतेच्या तक्रारींवर आधारित माहिती संकलनासाठी तेथे गेलो होतो असे म्हटले आहे. आपल्याकडे व्हिडिओ आणि ऑडिओ स्वरूपात काही पुरावे असून, ते लवकरच अधिकृत यंत्रणांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेच्या माध्यमातून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
राईकवार यांनी सर्व पत्रकार मित्रांना आणि जनतेला आवाहन केले आहे की, कृपया तथ्य तपासूनच बातमी प्रसिद्ध करावी आणि चुकीच्या माहितीमुळे कोणाच्याही प्रतिमेला हानी पोहोचू नये. पोलिसांनी स्वतः कबूल केल्यानंतरही "खंडणी"च्या खोट्या बातम्या पुढे न पसरवण्याची विनंती त्यांनी केली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून स्पष्टीकरण
दिनांक १७ जुलै, २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर द्वारे पोलीस वार्तापत्रात "बनावट तोतया पत्रकारापासुन सावधान, राज्य मार्गावरील ट्रक चालकांकडे खंडणी मागणारे व शासकीय अधिकाऱ्यांना धमकाविणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल" या मथळयाखालील बातमी प्रकाशित करण्यासाठी वार्तापत्र देण्यात आले होते. तरी, सदर बाबत स्पष्टीकरण करुन देण्यात येते की, सदर प्रकरणात खंडणी चा गुन्हा नसुन मोटार वाहन निरीक्षक यांचे शासकिय आदेशाचे उल्लंघन करुन त्यांना अश्लिल शिवीगाळ झाल्याची तक्रार प्राप्त आहे.