गडचिरोली:- मागील काही दिवसापासून जिल्हा भरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे कालपासून भामरागड सह एकूण ११२ गावांचा गडचिरोलीशी संपर्क तुटला आहे.
पोस्टे भामरागड अंतर्गत येणाऱ्या मौजा आरेवाडा येथील आरोग्य सेविका सीमा बांबोळे यांची प्रकृती आजारामुळे गंभीर होती. त्यांना योग्य आणि चांगल्या उपचारसाठी तातडीने गडचिरोलीला हलवण्याची आवश्यकता होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या माहितीवरून आणि सीमा बांबोळे यांना वैद्यकीय स्थलांतराची तात्काळ गरज लक्षात घेता, गडचिरोली पोलिसांचे पवन हंस हेलिकॉप्टर तात्काळ भामरागडसाठी रवाना आले होते. आरोग्य सेविका सीमा बांबोळे यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणण्यात आले आहे, त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड, पोस्टे भामरागड येथील अधिकारी व कर्मचारी, भामरागड तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी, पवन हंस पायलट डीआयजी. श्रीनिवास, सहपायलट आशिष पॉल यांच्या सहकार्याने पार पाडली.