जालना:- स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यामध्ये आल्या होत्या. यावेळी जालन्यात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी अडवलं. यानंतर पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईलने मागून लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
या दोघांनी कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पण पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादीना त्रास देत आहे असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून फिल्मी स्टाईलने मागून लाथ मारलेल्या पोलिसावरती मोठ्या प्रमाणावरती टीका होत आहे. पोलिसांनी यावेळी एका चिमुकल्या लेकरालाही हाताला धरून सोबत नेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.